पुणे : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता आषाढी वारीलाही बसू लागला आहे. पुणे जिल्ह्यासह परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून आळंदी शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणाऱ्या वारकरी, भाविक आणि नागरिकांना सध्या आळंदीकडे येऊ नये, असे महत्त्वाचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आळंदी शहरात प्रवेश करणे सुरक्षित नाही. त्यामुळे जे वारकरी आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत, त्यांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि पूरस्थिती पूर्ववत होईपर्यंत पुढील प्रवास टाळावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांच्या परिसरात जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू असून सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरजवळील वाखरी पालखी तळावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवून सुमारे दीड एकर जागा मोकळी करण्यात आली आहे. या जागेवर मुख्यमंत्री सुविधा केंद्र उभारण्यात येणार असून वारकरी भक्तांच्या निवास आणि इतर सोयीसुविधांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.