सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
  • मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळली; एकाच कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य
  • पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण
 विश्लेषण

पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

डिजिटल पुणे    06-07-2026 15:41:24

पुणे : पुणे जिल्ह्यासह पश्चिम घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, परिस्थिती कायम राहिल्यास धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. त्यामुळे नदीपात्रात जाणे टाळावे आणि नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

6 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत खडकवासला धरणात सुमारे 32 टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुढील 24 तासांत धरणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धरण 80 टक्क्यांहून अधिक भरल्यास सांडव्यावरून नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

प्रशासनाने नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीपात्रात फिरणे, पाण्यात उतरून सेल्फी काढणे किंवा जनावरे चारण्यासाठी नदीकिनारी जाणे टाळावे, तसेच जनावरे आणि मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. इंद्रायणीतील वाढलेले पाणी भीमा नदीत मिसळत असून, दौंड बंधाऱ्यातून सुमारे 27 हजार 847 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी केला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

दुसरीकडे, मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. लोणावळा–कर्जत घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने रेल्वे रुळांवर दगड आणि मातीचा ढिगारा साचला आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने कर्मचारी आणि यंत्रसामग्रीसह घटनास्थळी धाव घेतली आहे. मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे बचाव व दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असल्या तरी रेल्वे मार्ग शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती