सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर
  • राज्यात बहुतांश भागात 8 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरणार; मराठवाडा-विदर्भात कमी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
  • मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!
  • मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पात मोठा घोटाळा; नवयुगा, ॲफकॉन्स कंपन्यांवर कारवाई करा, रोहित पवारांची मोठी मागणी
  • पुण्यात मुसळधार पाऊस, एका रात्रीत धरणांमध्ये पावणेदोन महिने पुरेल इतका पाणीसाठा, खडकवासला 62 टक्के भरलं
 शहर

पुण्यात मुसळधार पावसाची दमदार बरसात; एका रात्रीत धरणसाखळीत मोठी वाढ, खडकवासला 62% भरले

डिजिटल पुणे    07-07-2026 13:05:51

पुणे : राज्यात मान्सूनचा जोर कायम असून पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. अवघ्या एका रात्रीत पुणे शहराला जवळपास पावणेदोन महिने पुरेल इतके पाणी धरणांमध्ये जमा झाले, तर गेल्या 24 तासांत साडेतीन महिन्यांच्या गरजेएवढा अतिरिक्त साठा वाढल्याची नोंद झाली आहे.

खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये 6 जुलै रोजी सकाळी 6 वाजता 6.93 टीएमसी पाणीसाठा होता. तो संध्याकाळपर्यंत 8.32 टीएमसीवर पोहोचला आणि मंगळवारी पहाटे 10.68 टीएमसी झाला. या धरणसाखळीची एकूण क्षमता 29 टीएमसी असून सध्या ती सुमारे 36.62 टक्के भरली आहे. दरम्यान, खडकवासला धरण 62 टक्के भरल्याने त्यातून लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. भीमा नदीत सुमारे 1.45 लाख क्युसेक वेगाने पाणी वाहत असून नदीपात्र तुडुंब भरले आहे. गेल्या 48 तासांत उजनी धरणातील पाणीसाठ्यात सुमारे सव्वाचार टीएमसीची वाढ झाली आहे.

पावसासोबतच पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या 101 शाळांना आठवडाभर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आळंदी आणि देहू येथे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे वारकऱ्यांच्या निवासासाठी या शाळांचा वापर केला जाणार आहे. मात्र, महापालिकेच्या इतर शाळा तसेच सर्व खासगी शाळा नियमित सुरू राहणार आहेत.

दुसरीकडे, पुणे आणि मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना धाराशिव जिल्ह्यात मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून सुमारे 70 टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती