नवी मुंबई : नवी मुंबईतील तळोजा परिसरात मंगळवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. सेक्टर 10 येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने रस्त्यावरील नागरिकांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने रस्त्यावरून जाणारे तसेच बाजूला उभे असलेले नागरिकांना चिरडले. धडकेची तीव्रता इतकी होती की अनेकजण हवेत फेकले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलवले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले. माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार ताब्यात घेतली असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पोलीस तपास सुरू आहे.