मुंबई : मराठी अभिनेता समीर खांडेकर यांनी मुलीच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमाची शाळा निवडण्याचा ठाम निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांनी बोरिवलीहून गोरेगाव आणि त्यानंतर दादर असा प्रवास केला. आज दादरमध्ये त्यांनी 'पिठी भात' या मराठमोळ्या मालवणी शाकाहारी रेस्टॉरंटचीही यशस्वी उभारणी केली आहे.
अलीकडील एका मुलाखतीत समीर खांडेकर यांनी आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रवासाबद्दल सांगितले. ते मूळचे अलिबागचे असून लग्नानंतर बोरिवली येथे वास्तव्यास होते. मात्र, वांद्रे-दादर परिसरात आल्यावर गावाकडच्या आठवणी जाग्या होत असल्याने या भागाशी त्यांचे विशेष भावनिक नाते निर्माण झाले.
दरम्यान, मुलगी शाळेत जाण्याच्या वयात आल्यानंतर तिला मराठी माध्यमातच शिक्षण द्यायचे, असा निर्णय त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने घेतला. सुरुवातीला गोरेगावमधील शाळेत प्रवेश घेतल्यानंतर कुटुंबाने तेथे स्थलांतर केले. त्यानंतर दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी दादरमध्ये कायमचे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
याच काळात समीर यांच्या मनात स्वतःचे मराठमोळे रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना आकाराला आली. योग्य जागेच्या शोधानंतर दादरमध्ये 'पिठी भात' या रेस्टॉरंटची सुरुवात झाली. येथे मालवणी पद्धतीचे शाकाहारी पदार्थ ग्राहकांना उपलब्ध आहेत.
या संपूर्ण प्रवासात आई आणि पत्नीचा मोठा पाठिंबा लाभल्याचे समीर खांडेकर यांनी नमूद केले. मुलीचे मराठी शाळेत शिक्षण, दादरमध्ये स्वतःचे घर आणि मराठमोळे रेस्टॉरंट उभारण्याचे स्वप्न त्यांच्या कुटुंबाच्या सहकार्यामुळे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.