पुणे : आषाढी वारी 2026 निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात 9 ते 12 जुलैदरम्यान आगमन, मुक्काम आणि प्रस्थान होणार आहे. लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीमुळे पुणे पोलिसांनी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.
आषाढी वारी 2026 निमित्त संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आगमन, मुक्काम व प्रस्थानासाठी पुणे शहर पोलिसांनी व्यापक बंदोबस्त आणि सुरक्षा नियोजन केले आहे. 9 ते 17 जुलै 2026 या कालावधीत पालखी सोहळा पुणे शहरातून मार्गक्रमण करणार असून, लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पालखी आगमनादरम्यान 9 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरात तर 10 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी राहणार आहे. त्यानंतर नियोजित तारखेनुसार दोन्ही पालख्यांचे प्रस्थान होईल.
यंदा सुरक्षेसाठी प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर, फेस रिकग्निशन प्रणाली, अॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स तसेच संत तुकाराम महाराजांच्या मार्गावर 125 AI लिंक्ड कॅमेरे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गावर 101 AI लिंक्ड कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय 28 ठिकाणी फेस रिकग्निशन कॅमेरे आणि 24 ठिकाणी 36 अॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
संपूर्ण पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि विसाव्याच्या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), ड्रोनद्वारे निगराणी तसेच सीसीटीव्ही देखरेख ठेवण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
भाविकांच्या सोयीसाठी पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे, वाहतूक बदल, पार्किंग आणि Live Location ची माहिती पुणे पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळ व समाजमाध्यमांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विविध ठिकाणी पोलिस मदत केंद्रेही उभारण्यात आली आहेत.
बंदोबस्ताची प्रमुख आकडेवारी
अप्पर पोलीस अधिकारी – 4
पोलीस उपायुक्त – 13
सहाय्यक पोलीस आयुक्त – 30
पोलीस निरीक्षक/पदाधिकारी – 152
पोलीस अंमलदार – 570
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) – 6 प्लॅटून
होमगार्ड – 1,250
बीट मार्शल – 13 हिट
BDDS पथके – 6 टीम
पुणे पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवण्याचे आणि पालखी सोहळा शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येणार असून, पालखीचे लाईव्ह लोकेशन आणि वाहतूक बदलांची माहिती नागरिकांना वेब आणि सोशल मीडियावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भाविकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.