सातारा : राज्यात मराठवाडा वगळता अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली असून महाबळेश्वर येथे तब्बल 513 मिलिमीटर (20 इंच) पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार हा पाऊस गेल्या शंभर वर्षांतील विक्रमी पावसांपैकी एक मानला जात आहे.
या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही रस्ते खचले, झाडे उन्मळून पडली, तर वीजपुरवठाही अनेक भागांत खंडित झाला आहे. घाटमार्गांवर माती व दगडांचे ढिगारे आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महाबळेश्वरमधील धबधबे, वेण्णा तलाव आणि इतर जलस्रोत तुडुंब भरले असून निसर्गाचे मनमोहक तसेच रौद्र रूप एकाचवेळी पाहायला मिळत आहे.
अतिट गावात ढगफुटीसदृश्य पाऊस
खंडाळा तालुक्यातील अतिट गावात रात्रभर झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्या-नाल्यांमध्ये आले. पुराचे पाणी मंदिर परिसर आणि गावातील रस्त्यांवरून वाहू लागल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे घरगुती साहित्य आणि शेतीचे नुकसान झाले असून प्रभावित शेतकरी व ग्रामस्थांना तातडीने मदत द्यावी, तसेच नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक सहाय्य जाहीर करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.