सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
 शहर

सिंहगड रस्त्यावर मेट्रोची तयारी सुरू; २५ किमीच्या नव्या मार्गिकांसाठी निविदा प्रक्रिया, वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा

डिजिटल पुणे    09-07-2026 14:56:08

पुणे : पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सिंहगड रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाला गती देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो)ने सिंहगड रस्त्यावरील दोन नव्या मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महामेट्रोकडून डांडेकर पूल ते खडकवासला आणि एसएमडीटी महाविद्यालय ते माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी सुमारे २५ किलोमीटर असून, त्यावर एकूण सहा मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गिका विकसित करताना भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे.

प्रकल्पांतर्गत सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलांच्या मधोमध मेट्रोचे खांब उभारले जाणार आहेत. तसेच माणिकबाग परिसरात दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रोचे काम एकाच वेळी करण्याचे नियोजन असल्याने वाहतुकीचे नियोजन काटेकोरपणे करावे लागणार आहे. त्यामुळे कामाच्या कालावधीत काही प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी, दीर्घकालीन दृष्टीने या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

महामेट्रोच्या माहितीनुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येईल. कंत्राट मिळाल्यापासून सुमारे ४२ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सिंहगड रस्ता, धायरी, माणिकबाग, खडकवासला आणि आसपासच्या परिसरातील हजारो नागरिकांना या मेट्रो मार्गिकेचा थेट लाभ होणार असून, शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही यामुळे मोठी भर पडणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती