पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (११ जुलै) हडपसर येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यासाठी हडपसर-मांजरी परिसर पूर्णपणे सज्ज झाला आहे. शहरातून ग्रामीण भागाकडे पालखी मार्गस्थ होत असल्याने लाखो वारकऱ्यांसह भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, पोलीस प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि स्वयंसेवकांनी व्यापक नियोजन केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गाडीतळ येथून सासवड मार्गे, तर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर महामार्गाने पंढरपूरकडे रवाना होणार आहे. या दोन्ही मार्गांवरील विसावा स्थळांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि मंडप उभारणीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गाडीतळ बसस्थानक परिसरात भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, फिरती शौचालये, औषध फवारणी, रस्त्यांची दुरुस्ती, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच कचरा व्यवस्थापनाची व्यापक तयारी करण्यात आली आहे. चारही विसावा स्थळांवर हिरकणी कक्ष, वैद्यकीय सुविधा आणि स्वागत केंद्र कार्यरत ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी आणि मुकादमांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनानेही भक्कम बंदोबस्त तैनात केला आहे. मार्गावर २३ वॉच टॉवर, चार ड्रोन, १४ मदत केंद्रे, बॅरिकेडिंग तसेच साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. साखळी चोर, भुरटे चोर आणि छेडछाडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत राहणार आहेत.
या बंदोबस्तात १७ वरिष्ठ अधिकारी, ४० पोलीस निरीक्षक, १४३ सहाय्यक व उपनिरीक्षक, १,४५८ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, ५० एनसीसी कॅडेट्स तसेच ३५० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजना, पोलीस मित्र आणि विविध सामाजिक संघटनांचेही सहकार्य प्रशासनाला लाभणार आहे.
भाविकांच्या सेवेसाठी परिसरातील विविध संस्था आणि मंडळांकडून अन्नदान, पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी ११२ या टोल-फ्री क्रमांकावर, महिलांनी १०९० हेल्पलाइनवर किंवा ०२०-२६९९६५७७ या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी अधिक सुविधायुक्त व्हावा, यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.