पुणे : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. गुरुवारी (ता. ९) शहरात पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरण आल्हाददायक झाले. याच पार्श्वभूमीवर शहरात दाखल झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. रस्त्यांवर वारकऱ्यांची गर्दी आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन ते चार दिवस पुणे शहरात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याने तेथे 'ऑरेंज अलर्ट' लागू ठेवण्यात आला आहे.
पावसाचा जोर ओसरल्यानंतर शहरातील सखल भागांतील पाणीही कमी झाले असून, वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पाऊस थांबल्याने तापमानातही वाढ झाली असून गुरुवारी शहरात ३० अंश सेल्सिअस कमाल आणि २२.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.
शुक्रवारी (ता. १०) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कमाल तापमान २९ अंश, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. रविवारपासून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
धरणांतील पाणीसाठा समाधानकारक
पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्येही पाणीसाठ्यात वाढ कायम आहे. वीर धरण १०० टक्के भरले असून खडकवासला ९८.४० टक्के, वडिवळे ९२.०४ टक्के, पवना ७३.८६ टक्के आणि भामा आसखेड ७३.४७ टक्के भरले आहे. उर्वरित धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा असून यंदाच्या पावसामुळे पाणीपुरवठ्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.