पुणे : आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी पुणे शहरात उत्साहात आगमन झाले. रिमझिम पावसाची साथ, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि *'ज्ञानोबा-तुकाराम'*च्या अखंड जयघोषाने संपूर्ण पुणे भक्तिरसात न्हाऊन निघाले. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे पारंपरिक पद्धतीने दोन्ही पालख्यांचे औक्षण करून पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वारकरी भगिनींसमवेत फुगडी खेळत वारीतील समता, भक्ती आणि आनंदाचा अनोखा अनुभव घेतला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग व पसायदानातील मानवता, विश्वकल्याण आणि बंधुभावाचा संदेशही यावेळी अधोरेखित करण्यात आला.
'पुणे प्रथम-सेवावारी २०२६' उपक्रमांतर्गत व्यापक सुविधा
पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे महानगरपालिकेने 'पुणे प्रथम-सेवावारी २०२६' हा विशेष उपक्रम राबविला आहे. पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद पथके तसेच नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून विविध विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.
याशिवाय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या *'पसायदान'*चा विश्वकल्याणाचा संदेश अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १० जुलै रोजी रात्री ९ वाजता सामूहिक ऑनलाइन पसायदान पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात देश-विदेशातील भाविक डिजिटल माध्यमातून सहभागी होणार आहेत.
यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सोपान चव्हाण, पक्षनेते नितीन गावडे, आयुक्त नवलकिशोर राम, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी व नागरिक उपस्थित होते.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, "ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन हा प्रत्येक पुणेकरासाठी अभिमानाचा क्षण आहे. वारकरी बांधवांची सेवा हीच खरी संतसेवा मानून महापालिकेचे सर्व विभाग अहोरात्र कार्यरत असून संतांचा समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."