सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
  • पुणेकरांना पुन्हा पाणीकपातीचा फटका; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, धरणांतील आवक घटल्याने प्रशासनाचा निर्णय
  • विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
  • ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
 क्राईम

पुण्यात सराफी दुकानावर थरारक चोरी; पाठीमागील भिंत फोडून ३० तोळे सोने, सव्वा किलो चांदी लंपास, रखवालदार फरार

डिजिटल पुणे    14-07-2026 12:05:23

पुणे : पुण्यातील मांजरी परिसरात एका सराफी दुकानात झालेल्या धाडसी चोरीने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दुकानाच्या पाठीमागील खोलीतून भिंत फोडून आत प्रवेश केला आणि लॉकर फोडत सुमारे ३० तोळे सोने तसेच सव्वा किलो चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना मुंढवा रस्ता, म्हसोबावस्ती येथील ‘आराध्या ज्वेलर्स’मध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी आधी दुकानालगत असलेल्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर भिंतीला मोठे भगदाड पाडून ते थेट सराफी दुकानात शिरले. दुकानातील लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडण्यासाठी गॅसकटरचा वापर करण्यात आला. चोरीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर मालकाच्या लक्षात हा प्रकार आला आणि तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे दुकानाच्या मागील बाजूस राहणारा नेपाळी रखवालदार. दोन महिन्यांपूर्वी त्याची सोसायटीत नियुक्ती करण्यात आली होती. ज्या खोलीत तो राहत होता, त्याच खोलीतून भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्यात आल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. चोरीनंतर तो बेपत्ता असून त्याच्याबाबतची कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा ओळख माहिती सोसायटीकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्याला कामावर आणणारा पूर्वीचा रखवालदारही सध्या संपर्काबाहेर असल्याने पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच मांजरी व हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हे शाखा, श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून काही संशयित कॅमेऱ्यात दिसत असले तरी चेहरे झाकलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे आव्हानात्मक ठरत आहे.

दरम्यान, पुण्यात यापूर्वीही अशाच प्रकारे भिंतीला भगदाड पाडून चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुरक्षाव्यवस्थेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करूनच नियुक्ती करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती