सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
  • एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
 DIGITAL PUNE NEWS

अमित शाहांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; ठाकरे गटातून आलेल्या 6 खासदारांसह रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता

डिजिटल पुणे    14-07-2026 12:57:25

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे सोमवारी (14 जुलै) एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांची उपस्थितीही अपेक्षित आहे. अलीकडेच पार पडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान होत असलेल्या या भेटीकडे राज्यासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीत ठाकरे गटातून आलेल्या सहा खासदारांच्या प्रवेशानंतर निर्माण झालेल्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा अधिवेशनात या मुद्द्यावर विरोधकांकडून आक्षेप किंवा कारवाईचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत सर्व सहा खासदारही दिल्लीत उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराचाही विषय बैठकीत चर्चिला जाऊ शकतो. शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका खासदाराला केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे या भेटीत राजकीय समीकरणांसह आगामी संसदीय रणनीतीवरही विचारविनिमय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने या घडामोडींवर आक्षेप कायम ठेवला आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांनी कोणतेही विलिनीकरण मंजूर केलेले नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे विलीनीकरण झाल्याचा दावा घटनात्मकदृष्ट्या वैध नसून यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे आवश्यक पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावर संसदेतही राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या खासदारांमध्ये संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सर्व खासदारांसह एकनाथ शिंदे अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा असून, या बैठकीत नेमके कोणते राजकीय निर्णय घेतले जातात आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती