पुणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात एकाचवेळी मोठी कारवाई करत ६० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित आयएसआय संपर्कांशी संबंधित संशयित व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली असून, काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील तरुणांशी संपर्क साधून त्यांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कांचे जाळे तयार करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. या नेटवर्कमागील उद्देश आणि त्यातील इतर संबंधितांचा शोध ATS घेत आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तरुणांना पैशांचे आमिष दाखवून या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. तसेच स्लीपर सेल उभारणी, गुप्त माहिती संकलन, अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध शस्त्रपुरवठा यांसारख्या गंभीर बाबींचाही तपास सुरू आहे.
यापूर्वीही राज्यातील विविध भागांत याच प्रकरणी ATS ने कारवाई केली होती. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली असून, या तपासातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासाच्या केंद्रस्थानी असलेला शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून, तो दुबईतून विविध गुन्हेगारी नेटवर्क चालवत असल्याचा संशय आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या मते, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून कट्टरतावादी विचारसरणी आणि देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ATS कडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.