पुणे : संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था उभारली असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ९ जुलै ते १२ जुलै २०२६ या कालावधीत पुण्यात पालखीचे आगमन, मुक्काम आणि प्रस्थान होणार असल्याने शहरात लाखो वारकरी, भाविक तसेच राज्यासह देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे शहर पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावरील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गुन्हे शाखा, अँटी चेन स्नॅचिंग पथके तसेच विशेष तपास पथके सक्रिय करण्यात आली आहेत. विशेषतः चेन स्नॅचिंग, पाकिटमारी आणि इतर गुन्हे रोखण्यासाठी संशयित व्यक्तींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान ९ जुलै ते १२ जुलै या चार दिवसांत ६५ महिला आणि ३३ पुरुष अशा एकूण ५८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित संशयितांची सहायक पोलिस निरीक्षक आणि विविध पोलिस पथकांकडून चौकशी सुरू असून, त्यांच्याविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पुणे शहर पोलिसांनी वारकरी आणि नागरिकांना मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे, संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालखी सोहळा संपल्यानंतर या कारवाईत निष्पन्न झालेल्या आरोपींची संख्या आणि त्यांची माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.