नवी दिल्ली : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान' या नावाने प्रसारित करण्यात आलेल्या कथित पत्रात बलुचिस्तानच्या सुमारे 85 टक्के भूभागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच स्वतंत्र ध्वज, राष्ट्रगीत, चलन आणि प्रशासकीय व्यवस्था सुरू केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
व्हायरल पत्रानुसार, बलुचिस्तानमधील नैसर्गिक वायू क्षेत्रे, खनिजसंपत्ती आणि कोळसा खाणींवर नव्या प्रशासनाने नियंत्रण मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांतील काही बलुच अधिकाऱ्यांनी राजीनामे देत स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, बलुचिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून पाकिस्तान सरकारविरोधात असंतोष असून, मानवाधिकार उल्लंघनाचे आरोपही सातत्याने होत आहेत. अलीकडील काळात बलुच फुटीरतावादी गट आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पाकिस्तानने 'ऑपरेशन शाबान' अंतर्गत अनेक बंडखोर ठार केल्याचा दावा केला आहे.
मात्र, बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र झाल्याच्या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. कोणत्याही देशाने किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नसल्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दाव्याकडे सावधगिरीने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
