पुणे : कोथरूडमध्ये मोबाईल व्यावसायिक अमित शिंदे यांच्यावर झालेल्या कोयत्याच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पुण्यात निलेश घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे हे निलेश घायवळविरोधात दाखल असलेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यातील फिर्यादी असल्याने या हल्ल्यामागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, पोलिसांनी हा हल्ला प्राथमिक तपासात वैयक्तिक वादातून झाल्याचे सांगितले असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
माहितीनुसार, अमित शिंदे यांचे कोथरूडमध्ये मोबाईलचे दुकान आहे. काही वर्षांपूर्वी निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या दुकानातून सिमकार्ड घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या सिमकार्डचा वापर विविध गुन्ह्यांमध्ये झाल्याचे तपासात समोर आल्यानंतर शिंदे यांच्या तक्रारीवरून घायवळविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मकोका कारवाईसाठी हा गुन्हा महत्त्वाचा मानला गेला होता.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास अमित शिंदे दुकानाबाहेर उभे असताना आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला. डोक्यावर गंभीर वार झाल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. जखमी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यामागे नातेवाईकांमधील वाद असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शिंदे यांनी यापूर्वी निलेश घायवळविरोधात दिलेल्या तक्रारीमुळे या हल्ल्याचा त्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
निलेश घायवळ सध्या परदेशात असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत कोथरूडमधील हा हल्ला आणि त्यामागील संभाव्य गुन्हेगारी कनेक्शन यामुळे पुण्यात संघटित गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी मात्र अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येईल, असे स्पष्ट केले आहे.