सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 क्राईम

चार वर्षांच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत; लग्नाला घरच्यांचा विरोध, विष प्राशनानंतर तरुणाचा मृत्यू, प्रेयसीची प्रकृती चिंताजनक

डिजिटल पुणे    15-07-2026 12:21:34

नागपूर : नागपूरच्या वानाडोंगरी परिसरात प्रेमसंबंधाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीने कुटुंबीयांच्या संमतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केल्याने ते मानसिक तणावात आले. त्यानंतर त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना घडली. या प्रकरणात २१ वर्षीय विशाल विलास जावडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, २० वर्षीय तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल हा मंडप सजावटीचे काम करण्याबरोबरच ऑटो-रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याचे वानाडोंगरी परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पळून जाऊन लग्न करण्याऐवजी कुटुंबीयांच्या आशीर्वादानेच संसार सुरू करावा, अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी आपल्या घरच्यांकडे विवाहाची परवानगी मागितली होती.

मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी या विवाहाला स्पष्ट नकार दिल्याचे सांगितले जात आहे. रविवारी या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाल्यानंतर दोघेही प्रचंड मानसिक तणावाखाली होते. अखेर सोमवारी दुपारी त्यांनी वानाडोंगरी-संगम गाव मार्गावरील एका मोकळ्या मैदानात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळातच दोघांची प्रकृती गंभीर झाली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ दोघांना शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांवर उपचार सुरू केले. मात्र, विषाचे प्रमाण अधिक असल्याने विशालची प्रकृती झपाट्याने खालावली आणि रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

या घटनेमुळे वानाडोंगरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमविवाहासाठी कुटुंबीयांची संमती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुण-तरुणीच्या आयुष्याला दुर्दैवी वळण लागल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती