सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
  • एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
 जिल्हा

छत्रपती संभाजीनगर हादरलं!पैशांच्या वादाने घेतला सुखी संसाराचा बळी; विवाहितेची गळा आवळून हत्या, 14 महिन्यांच्या निष्पाप चिमुकल्यालाही संपवलं

डिजिटल पुणे    17-07-2026 13:05:38

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. बेपत्ता झालेल्या 26 वर्षीय सायमा चौधरी आणि तिच्या अवघ्या 14 महिन्यांच्या मुलाचा निर्घृण खून झाल्याचे तपासातून समोर आले आहे. आर्थिक व्यवहारातील वादातून ही थरारक घटना घडल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात स्पष्ट केले आहे. आरोपींनी पैशांची परतफेड करण्याचे आमिष दाखवून सायमाला बोलावले आणि कारमध्येच तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील एका विहिरीत टाकण्यात आला.

या प्रकरणातील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे सायमासोबत असलेल्या तिच्या अवघ्या 14 महिन्यांच्या निष्पाप मुलालाही आरोपींनी जीवंत ठेवले नाही. या चिमुकल्याला वाहत्या पाण्यात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सायमा चौधरी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली. या तपासादरम्यान संशयाची सुई नुरजमा अहमद चौधरी आणि सद्दाम ऊर्फ आमीर चौधरी यांच्याकडे वळली. चौकशीदरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायमाचा मृतदेह नाशिकमधील विहिरीत आढळून आला असून तिची ओळख कपडे आणि अंगावरील दागिन्यांच्या आधारे पटविण्यात आली. दरम्यान, या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि गुन्ह्याचा संपूर्ण कट उलगडण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस सखोल तपास करत आहेत. या अमानुष घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती