सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
  • एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
 राज्य

'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय...'; सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचा गंभीर इशारा, उपोषणाचा 20वा दिवस

डिजिटल पुणे    17-07-2026 17:30:33

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या 20व्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 20 जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच दिवशी संसदेकडे निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले. "शरीराने अशक्त झालो असलो तरी मनाने खंबीर आहे," असे सांगताना त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत, "मोर्चा यशस्वी झाला नाही तर भूत बनून परत येईन," अशी टिप्पणी केली.

डॉक्टरांचा इशारा; अवयव निकामी होण्याचा धोका

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत आहेत. या काळात त्यांचे सुमारे 9 किलो वजन घटले असून, दीर्घकाळ अन्नत्यागामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. प्रकृती अधिक खालावल्यास तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश

वांगचुक यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यक वाटल्यास तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही न्यायालयाने प्रशासनाला दिल्या आहेत.

20 जूनपासून सुरू आंदोलन

नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) 20 जूनपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत असून, सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

यापूर्वीही आंदोलनासाठी तुरुंगवास

याआधी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सुमारे 170 दिवस जोधपूर कारागृहात घालवले होते. 2025 मधील आंदोलनादरम्यान हिंसाचार भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.


 Give Feedback



 जाहिराती