मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सापाच्या दंशामुळे झालेला मृत्यू म्हणून समोर आलेल्या एका घटनेने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि आणखी दोघांना अटक केली असून, हा सुनियोजित हत्येचा कट असल्याचा दावा केला आहे. प्रेमसंबंध आणि सुमारे २० लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेच्या लोभातून ही हत्या केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत अतुल पवार याला आधी दुधातून झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. तो गाढ झोपेत गेल्यानंतर आरोपींनी त्याच्या अंथरुणात विषारी साप सोडल्याचा आरोप आहे. सापाच्या दंशामुळे त्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण घटना नैसर्गिक अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी पत्नी दामिनी स्वतः अतुलला रुग्णालयात घेऊन गेली. तिने डॉक्टरांना रात्री सापाने चावा घेतल्याचे सांगितले. मात्र, घटनास्थळी साप ज्या अवस्थेत आढळला आणि काही संशयास्पद बाबी लक्षात आल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
तपासादरम्यान दामिनीच्या मोबाईल कॉल डिटेल्समधून शाळेचा ड्रायव्हर तुषार ऊर्फ निक्की याच्याशी तिचे सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. चौकशीत तुषारच्या मोबाईलमध्ये एका डब्यात ठेवलेल्या विषारी सापाचा फोटोही आढळून आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा साप दोन गारुड्यांकडून विकत घेण्यात आला होता.
पोलिसांनी सांगितले की, अतुलच्या नावावर सुमारे २० लाख रुपयांचा विमा होता. त्याच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम मिळवून आरोपींनी एकत्र राहण्याचा कट रचल्याचा संशय आहे. तसेच, कटात सहभागी इतर दोघांना या रकमेतून हिस्सा देण्याचे आश्वासन दिल्याचाही आरोप आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. सुमारे २० दिवसांपूर्वी अतुलला कारने धडक देऊन ठार मारण्याचाही प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला होता. तो प्रयत्न फसल्याने नंतर सापाचा वापर करून हत्या करण्याचा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, अतुल आणि दामिनी यांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघे मिळून एक खासगी शाळा चालवत होते. मात्र, शाळेत काम करणाऱ्या ड्रायव्हरशी दामिनीची जवळीक वाढल्यानंतर या नात्याचे रूप कथित हत्येच्या कटात बदलल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अविनाश पांडे यांनी सांगितले की, घटनास्थळावरील परिस्थिती, तांत्रिक पुरावे, मोबाईल डेटा आणि चौकशीच्या आधारे संपूर्ण कट उघडकीस आला. जप्त केलेला साप, मोबाईल फोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, वैज्ञानिक अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सध्या या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींविरुद्ध हत्या, गुन्हेगारी कट आणि इतर संबंधित कलमांनुसार कारवाई सुरू असून, तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांचा हा तपास आणि त्यातील दावे न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.