वर्धा : समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळजवळ रविवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी संपूर्ण कुटुंब पुण्यात गेले होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलगी पुण्यातच राहिली, तर आई-वडील आणि दुसरी मुलगी वर्ध्याकडे परतत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेने सालोड-हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश टिपले, पत्नी सुषमा टिपले, त्यांची १६ वर्षीय मुलगी जान्हवी आणि कारचालक पुण्यावरून वर्ध्याकडे परतत होते. समृद्धी महामार्गावरील विरुळ परिसरात इथेनॉल वाहून नेणाऱ्या वाहनाचा यापूर्वीच अपघात झाल्याने वाहतूक वळविण्यात आली होती. याचदरम्यान भरधाव कारची मालवाहू वाहनाशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारने क्षणार्धात पेट घेतला आणि कारमधील चौघेही जण आगीत होरपळून मृत्युमुखी पडले.
या अपघातात मालवाहू वाहनाचा चालक अंकुश लक्ष्मण राऊत (३१) याचाही मृत्यू झाला असून वाहनातील क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी कारचे अवशेष आणि सामान विखुरलेले दिसत होते. अपघातानंतर इथेनॉल सांडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आणि प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू केली.
प्राथमिक तपासानुसार, अपघातग्रस्त वाहनाचा अंदाज न आल्याने कारची धडक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महामार्ग पोलीस, पुलगाव पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मृतांची नावे :
राजेश आनंद टिपले (५०)
सुषमा राजेश टिपले (४५)
जान्हवी राजेश टिपले (१६)
कारचालक (नाव समजू शकलेले नाही)
टँकर चालक अंकुश लक्ष्मण राऊत (३१)
इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी मुलीला पुण्यात सोडून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.