पुणे : श्री स्वामी समर्थ मठ(साकुर्डे,जेजुरी) च्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन दि.२९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. वृक्षदान कार्यक्रम, महाप्रसाद, पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीचा 'स्वामी समर्थ भूषण पुरस्कार २०२६' दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब झेंडे यांना जाहीर झाला आहे. शिल्पकार स्व. अविनाश दिनकर थोपटे, चित्रकार स्व. रणजीत शिवाजीराव खवले यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सामाजिक,कला क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान केला जातो.या सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय पुरस्कार विजेते व जेजुरी भूषण ज्येष्ठ शिल्पकार दिनकर थोपटे आणि स्वामी समर्थ मठ मंदिर समिती, साकुर्डे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरस्काराचे यंदाचे मानकरी बाळासाहेब झेंडे हे स्वतः अपंग (दिव्यांग) असूनही, समाजातील मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तींना मोठा आधार देत आहेत. त्यांच्या माध्यमातून 'अपंग विकास मंडळ, सासवड' आणि 'जीवनवर्धिनी विद्यालय' या संस्था अत्यंत प्रभावीपणे चालवल्या जातात. मानचिन्ह आणि संस्थेसाठी रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दिनांक २९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ मठ, थोपटेवाडी, साकुर्डे येथे होणार आहे. या निमित्ताने मठात वृक्षदान कार्यक्रम आणि भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ मठ मंदिर समिती वर्षभर अशा विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करत असते. नुकतेच मठाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना महाप्रसाद वाटप करण्यात आले,अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने दीपक थोपटे यांनी दिली.