सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 राज्य

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; अमित शाहांच्या भेटीसाठी धर्मेंद्र प्रधान रवाना, राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

डिजिटल पुणे    20-07-2026 16:42:22

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. जंतरमंतरवर सुरू असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि दिल्ली पोलिसांमध्ये संघर्ष झाल्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सीजेपीने नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेवर मोर्चाची हाक दिली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी मोर्चाला जंतरमंतरपासून मर्यादित अंतरापर्यंतच परवानगी दिल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी आंदोलनाची प्रमुख मागणीच शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देणार का, याबाबत राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिक्षणमंत्र्यांवर जोरदार टीका केली. "जनाची नाही तर मनाची लाज असेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. सरकारने आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी बळाचा वापर करणे ही लोकशाहीला शोभणारी बाब नाही," असे ते म्हणाले.

दिल्लीतील आंदोलन, संसद अधिवेशन आणि शिक्षणमंत्र्यांची अमित शाह यांच्यासोबतची बैठक या घडामोडींमुळे पुढील काही तासांत केंद्र सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती