सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 शहर

नऱ्हेतील नवले पुलाजवळ धावत्या कारला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

डिजिटल पुणे    21-07-2026 10:50:16

पुणे  : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ सोमवारी रात्री धावत्या चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कारला वेढा घातला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत वाहनाबाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी कार नऱ्हे येथील नवले पुलाजवळील स्मशानभूमी परिसरातून जात असताना चालक रोहित कडूसकर (वय ३२) यांच्या निदर्शनास वाहनाच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे आले. सुरुवातीला किरकोळ तांत्रिक बिघाड असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र, काही क्षणांतच धुराचे प्रमाण वाढले आणि इंजिनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या.

धोक्याची जाणीव होताच चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि स्वतः बाहेर पडत इतर वाहनचालकांनाही सावध केले. काही क्षणांतच कारने पूर्णपणे पेट घेतल्याने वाहनातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की, दूरवरून धुराचे लोट दिसत होते. या घटनेमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा अन्य वाहनांना आगीची झळ बसली नाही.

दरम्यान, आगीमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जळालेली कार बाजूला हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, वाहनातील तांत्रिक बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असून, संबंधित यंत्रणांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करून देखभाल करावी, तसेच प्रवासादरम्यान धूर, जळल्याचा वास किंवा इंजिनमधील असामान्य आवाज जाणवल्यास तात्काळ वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती