सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 विश्लेषण

मुंबई, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

डिजिटल पुणे    21-07-2026 16:29:48

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) 21 ते 25 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि सातारा घाटमाथा तसेच कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागांसाठी ऑरेंज तर काही ठिकाणी रेड अलर्टही देण्यात आला आहे.

कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम

गुजरात किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव वाढणार आहे. नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असल्याने पुढील दोन ते तीन दिवस अनेक जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

21 जुलै : कुठे कोणता अलर्ट?

आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

22 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट

22 जुलै रोजी पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असेल. मुंबई आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही पावसाचा यलो अलर्ट कायम राहणार आहे.

23 ते 25 जुलै : कोकणात पावसाचा जोर कायम

23 जुलै रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर यलो अलर्ट राहील, तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम असेल. 24 जुलै रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथा आणि गोंदिया येथे यलो अलर्ट आहे. 25 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याचाही इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 ते 48 तासांत कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नागरिकांनी घ्यावी खबरदारी

मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरापासून दूर राहावे आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती