सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 शहर

भारती विद्यापीठ आयएमईडीचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात ;उद्योगजगतात आणि लोकसेवेतही व्यवस्थापन महत्वाचे :शेखर सिंह

डिजिटल पुणे    21-07-2026 18:35:54

पुणे : भारती विद्यापीठ  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) येथे एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमाच्या २०२६–२८ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत व दीक्षारंभ कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सुरुवात भारती विद्यापीठाच्या पौड रस्ता  कॅम्पस येथील सभागृहात झाली. भारतातील १६ हून अधिक राज्यांतील आणि ६५ पेक्षा अधिक शहरांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला भारती विद्यापीठाचे कार्यवाह  व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) चे कुलगुरू प्रा. डॉ. विवेक सावजी, कुंभमेळा आयुक्त आयएएस अधिकारी शेखर सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच पीएनजी ज्वेलर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर,उपसंचालक डॉ. आर. व्ही. महाडिक यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.    

शेखर सिंह आणि सौरभ गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, शिस्तबद्ध अंमलबजावणी, सातत्यपूर्ण शिक्षण, सांघिक कार्य आणि आव्हाने स्वीकारण्याचे धैर्य ही यशस्वी व्यवस्थापनाची सूत्रे असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांमुळे आजच्या गतिमान व्यावसायिक वातावरणातील नेतृत्व आणि निर्णयक्षमतेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.प्रमुख पाहुणे शेखर सिंह यांनी "जगातील सर्वात मोठ्या मानवी मेळाव्याचे व्यवस्थापन – कुंभमेळा" या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या आधारे त्यांनी धोरणात्मक नियोजन, नेतृत्व, समन्वय, संकट व्यवस्थापन आणि लोकसेवेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनात लवचिकता, परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता आणि नैतिक नेतृत्व विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले."विश्वास आणि परंपरेपासून जागतिक विस्तारापर्यंत वारसाहक्काचा उद्योग उभारण्याचा प्रवास" या विषयावर मार्गदर्शन करताना सौरभ गाडगीळ यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण धडे विद्यार्थ्यांसमोर मांडले. मूल्यांची जपणूक करत नवोपक्रम आणि सातत्यपूर्ण शिक्षणाचा स्वीकार केल्यास शाश्वत संस्था उभारता येतात, असे त्यांनी सांगितले.

डॉ. विश्वजीत कदम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्वतःला सातत्याने अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्याचे आणि ज्ञान, चारित्र्य व सामाजिक बांधिलकी यांच्या आधारे समाज व राष्ट्रसेवेसाठी स्वतःला तयार करण्याचे आवाहन केले. त्यांनी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याची आठवण करून देत सर्वसामान्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याच्या त्यांच्या ध्येयाचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगत जबाबदार जागतिक नागरिक म्हणून स्वतःची जडणघडण करावी, असेही त्यांनी सांगितले.कुलगुरू प्रा. डॉ. विवेक सावजी यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठात उपलब्ध असलेल्या परिवर्तनशील शैक्षणिक संधींचा लाभ घेण्याचे आणि शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

 आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर यांनी प्रास्ताविक करत उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, पालक आणि नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी आयएमईडी ही संस्था शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्यपूर्णता आणि उद्योग क्षेत्राशी सुसंवाद यांद्वारे भविष्यातील सक्षम नेतृत्व घडविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी संस्थेत उपलब्ध असलेल्या विविध संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. आर. व्ही. महाडिक यांनी आभार  मानले.या दीक्षारंभ कार्यक्रमादरम्यान आयएमईडीने एनएसडीसी लॅबसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या सहकार्यामुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील संबंध अधिक दृढ होणार असून कौशल्य विकास, तंत्रज्ञानाधारित शिक्षण, नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधन आणि विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनाशी संबंधित प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची उद्योग क्षेत्रासाठीची तयारी अधिक सक्षम होईल.


 Give Feedback



 जाहिराती