नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील आंदोलनाला आता विरोधकांचा जोरदार पाठिंबा मिळू लागला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवत सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शरद पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि पोलिस कारवाईची माहिती घेतली. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असतानाही जबाबदारांवर कारवाई होत नसल्याची भावना आंदोलकांनी त्यांच्यासमोर व्यक्त केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीबाबतही शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज या विषयावर संसदेत चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, चर्चेपूर्वी सरकारशी चर्चा करावी लागेल, असे उत्तर मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र टीका केली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी पुन्हा केली. तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी जबाबदार असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीही रुग्णालयाला भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि डॉक्टरांसोबत आपत्कालीन आढावा बैठक घेतली.