सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 शहर

अजितदादांनी उद्घाटन केलेल्या सीटीस्कॅन मशीनमध्येच झाला अखेरचा स्कॅन; जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

डिजिटल पुणे    22-07-2026 16:50:44

बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त बारामतीत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत खासदार पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित होते. या निमित्ताने एका मुलाखतीत जय पवार यांनी अजित पवार यांच्या अखेरच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांनी सांगितलेला एक प्रसंग अनेकांना भावूक करून गेला.

जय पवार यांनी सांगितले की, २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर सकाळी त्यांना पार्थ पवार यांचा फोन आला. दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी कोणताही वेळ न दवडता स्वतः गाडी चालवत बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. "मला वाटतं, अजितदादांचा मृतदेह पाहणारा पवार कुटुंबातील पहिला सदस्य मीच होतो," असे त्यांनी सांगितले.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर सर्वांत महत्त्वाचा निर्णय पोस्टमार्टेमचा होता. त्या वेळी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे विमानात असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. मात्र, पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोस्टमार्टेम करणे आवश्यक असल्याने तो निर्णय घ्यावा लागला, असे जय पवार यांनी सांगितले.

याचवेळी घडलेला एक प्रसंग आठवत त्यांनी भावना व्यक्त केल्या. काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सीटीस्कॅन मशीनचे उद्घाटन केले होते. नियतीचा विलक्षण योग असा की, त्यांच्या निधनानंतर पोस्टमार्टेमपूर्वी त्यांच्याच पार्थिवाचे स्कॅन याच मशीनमध्ये करण्यात आले. "त्या मशीनचं उद्घाटन दादांनी स्वतः केलं होतं आणि काही महिन्यांतच त्याच खोलीत त्यांचा मृतदेह स्कॅन होताना पाहावा लागला. अशी वेळ आपल्या आयुष्यात येईल, असं कधीच वाटलं नव्हतं," असे सांगताना जय पवार भावूक झाले.

मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या शेवटच्या भेटीचाही उल्लेख केला. २६ जानेवारी रोजी सकाळी ते जिजाई बंगल्यावर गेले होते. त्या दिवशी अनेक बैठका सुरू होत्या. नेहमीप्रमाणे बैठका संपल्यानंतर ते निघून न जाता दिवसभर अजित पवार यांच्यासोबतच थांबले. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठीही ते त्यांच्यासोबत गेले. "त्या दिवशी मनातून सतत त्यांच्यासोबत राहावं, असं वाटत होतं. का ते आजही समजत नाही," असे त्यांनी सांगितले.

सायंकाळी जिजाई बंगल्यावर परतल्यानंतर जय पवार यांनी अजित पवार यांना, "डॅड, आता किती काम करणार? थोडी विश्रांती घ्या," असे सांगितले. त्यावर अजित पवार हसत म्हणाले, "जयड्या, ही शेवटची निवडणूक आहे. यानंतर आपण सगळे सुट्टीवर जाऊ." मात्र, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. दोन दिवसांनी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आणि त्यांचे ते शब्दच कुटुंबासाठी कायमच्या आठवणी ठरले.

अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त या आठवणींना उजाळा देताना जय पवार यांचा कंठ अनेकदा दाटून आला. त्यांच्या भावना ऐकून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्यासोबत घालवलेले शेवटचे क्षण आणि नियतीने घडवलेला तो विलक्षण योग आजही संपूर्ण पवार कुटुंबासाठी विसरणे अशक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती