सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 विश्लेषण

नाशिक अलर्ट! गोदावरीला मोसमातील सर्वात मोठा पूर; संध्याकाळपर्यंत धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता

डिजीटल पुणे    23-07-2026 17:22:47

नाशिक : नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे, रामसेतू पूल आणि घाटावरील भाग पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने संध्याकाळपर्यंत गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याचा इशारा दिल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गंगापूर धरण ९७ टक्के भरल्यामुळे तेथून सध्या सुमारे १३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांमधून येणारे पाणी गंगापूरमध्ये दाखल होत असल्याने विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार, सायंकाळपर्यंत होळकर पुलाखालून सुमारे २४ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह वाहू शकतो, जो धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक आहे.

गोदाघाटावरील प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मंदिरापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे जलमय झाली आहेत. पूरस्थिती गंभीर होत असल्याने गोदाघाट परिसरातील दुकाने, टपऱ्या आणि इतर व्यावसायिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, धरणांमधून होणारा विसर्ग आणि सततचा पाऊस यामुळे गोदावरीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे गेल्या २४ तासांत तब्बल १९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. सुरगाणा तालुक्यात नाल्यात पाय घसरून पडल्याने ४२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर गुजरातमधील वलसाड येथे पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

महापालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हाय अलर्टवर असून नागरिकांनी गोदावरी नदीकाठी गर्दी करू नये, पुराचे पाणी पाहण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती