सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 शहर

बाणेर प्राणी संगोपन केंद्र प्रकरण तापले; संदीप स्वामी अन् शिवप्रहार संघटनेचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

डिजिटल पुणे    23-07-2026 18:29:03

पुणे : बाणेर येथील प्राणी संगोपन केंद्राच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादाला आता गंभीर वळण मिळाले असून, संदीप स्वामी यांना न्याय मिळावा आणि प्राणी संगोपन केंद्र प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवप्रहार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल बोटेपाटील आणि पीडित संदीप महादेव स्वामी यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

संदीप स्वामी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात कैलास वाणी, कैवल्य वाणी, जयश्री वाणी, शिवराज केदारी, अभिषेक केदारी आणि अभिनिजीत केदारी यांची नावे नमूद केली आहेत. तक्रार अर्जात संबंधित व्यक्तींच्या सांगण्यावरूनच प्राणी संगोपन केंद्र, घर व दुकानाचे नुकसान  कामगार, बाऊंसर अन् जेसीबीच्या साहाय्याने केल्याचा, तसेच प्राण्यांशी संबंधित गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, बाणेर सर्व्हे क्रमांक ५ (लिंक रोड) येथील प्राणी संगोपन केंद्राची जागा अनधिकृतपणे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नातून हा प्रकार घडला. यामध्ये ‘गोल्डी’ नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा तसेच दोन विदेशी कुत्रे, दोन पर्शियन मांजरी आणि सुमारे ४० विदेशी पक्षी बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेपत्ता प्राणी-पक्ष्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित बिल्डर व बिल्डरशी संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवप्रहार संघटनेने केली आहे.

 तसेच, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, बिल्डरचे नाव गुन्ह्यात घेऊ नये, असा दबाव टाकून संबंधितांना मदत केल्याचा आरोप असलेल्या बाणेरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दोषींवर तातडीने कठोर गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी, बेपत्ता विदेशी कुत्रे, पर्शियन मांजरी व विदेशी पक्ष्यांचा शोध घ्यावा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच संदीप स्वामी यांना न्याय मिळवून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

‘न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार’

या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. ‘संदीप स्वामी यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘दोषींवर कारवाई करा’, ‘प्राणी क्रूरता थांबवा’ अशा घोषणांसह शिवप्रहार संघटनेने आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

"संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे आणि संदीप स्वामी यांना न्याय मिळवून द्यावा. न्याय मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील," असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिवप्रहार संघटनेचे प्रदेश संघटक महेश टेळेपाटील आणि प्रदेश सचिव स्वप्नील नागटिळक यांच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाची तातडीने दखल घेऊन चौकशी व योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

टीप : वरील व्यक्तींविरुद्ध नमूद केलेले आरोप हे संदीप स्वामी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जातील आरोप आहेत. या आरोपांची सत्यता तपासणे आणि दोष निश्चित करणे हे पोलिस तपास व न्यायप्रक्रियेच्या अधीन आहे.


 Give Feedback



 जाहिराती