पुणे : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर, नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणावर आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात कॉक्रोच जनता पार्टी (CJP) तर्फे आज (24 जुलै) पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले असून, नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईनंतर हा मुद्दा देशभर चर्चेत आला. त्यानंतर सीजेपीने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्यात हा मोर्चा काढण्यात येत आहे. शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
यापूर्वी 20 जुलै रोजी सीजेपीने जंतरमंतर ते संसद असा मोर्चा काढला होता. या आंदोलनात देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, विविध विद्यार्थी संघटना, युवक संघटना आणि सामाजिक संस्थांनी शांततापूर्ण पद्धतीने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
आजचा मोर्चा लाल महाल येथून सुरू होणार असून फडके हौद, दारुवाला पूल, नरपतीगिरी चौक, बेलाई माता मंदिर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पुणे वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी अधिकृत 'एक्स' (X) पोस्टद्वारे वाहतुकीतील बदलांची माहिती दिली आहे. आंदोलनादरम्यान काही प्रमुख मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार असून, नागरिकांनी शक्यतो प्रभावित मार्ग टाळावेत, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे मार्ग राहणार प्रभावित
गणेश रोड – वाहतूक लक्ष्मी रोडकडे वळविण्यात येईल.
केळकर रोड – सूर्या हॉस्पिटल – 15 ऑगस्ट चौक मार्गाचा वापर करावा.
शिवाजी रोड – एबीसी चौक – फुटका बुरुज मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल.
नेहरू रोड – जंगली महाराज रोड, नदीपात्र मार्ग किंवा टिळक रोड – बॅनर्जी चौक – नेहरू मेमोरियल मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवासापूर्वी नियोजन करण्याचा सल्ला
मोर्चामुळे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा. तसेच प्रभावित मार्ग टाळून पर्यायी रस्त्यांचा वापर केल्यास गैरसोय टाळता येईल, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आज दिवसभर शहरातील वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.