सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 शहर

सिंहगड रस्त्यावर चिखल, खड्डे अन् वाहतूक कोंडीचा कहर; नागरिकांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी

डिजिटल पुणे    24-07-2026 12:53:01

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सिंहगड रस्ता परिसरातील वाहतुकीला बसला आहे. रस्त्यावर साचलेला चिखल, पाणी आणि मोठमोठे खड्डे यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वारंवार वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघात घडत आहेत.

माणिकबाग डीपी रस्ता ते हिंगणे चौकादरम्यान पुणे आणि धायरी या दोन्ही दिशांकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहने घसरत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. परिसरात सुरू असलेल्या विविध खोदकाम आणि बांधकामांमुळे अवजड वाहनांच्या चाकांमधील चिखल मुख्य रस्त्यावर येत असून, पावसामुळे हा रस्ता अधिक निसरडा बनला आहे.

अग्निशामक दलाकडून रस्ता स्वच्छ करण्याचे काम सातत्याने सुरू असले, तरी बांधकाम साहित्याची वाहतूक सुरूच असल्याने काही वेळातच पुन्हा चिखल साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. रस्त्यांवरील उखडलेली खडी, चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने प्रायेजा सिटीकडून मुख्य सिंहगड रस्ता तसेच महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

धायरी, नऱ्हे, वडगाव आणि परिसरातील हजारो नागरिकांना या परिस्थितीचा रोजच फटका बसत आहे. स्थानिकांनी महापालिकेकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, चिखल हटविण्याची प्रभावी व्यवस्था आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोद्दार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


 Give Feedback



 जाहिराती