पालघर : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना धामणी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे दाभाडी बेटावर भात लागवडीसाठी गेलेले दहा नागरिक तब्बल २४ तासांहून अधिक काळ अडकून पडले होते. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त बचाव मोहिमेत त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
दरम्यान, डहाणू तालुक्यातील चिंचणी परिसरातील काजळपाडा, नागेश्वरी पाडा आणि कोसरे तलाव परिसरातील ८० ते ९० घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून मदतकार्य सुरू केले असून जिल्हाधिकाऱ्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे आणि मदतीचे आदेश दिले आहेत.
पालघरमध्ये इतका पाऊस का पडतो?
उत्तर कोकण, विशेषतः पालघर जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमागील शास्त्रीय कारण एका संशोधनातून समोर आले आहे. 'करंट सायन्स' या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे पालघर परिसरात एकत्र येतात. या वाऱ्यांच्या संगमामुळे वातावरणात कमी दाबाचा विशेष पट्टा तयार होतो आणि त्यातून प्रचंड पावसाळी ढगांची निर्मिती होते.
हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप, एस. भुते आणि के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या संशोधनात २१ सप्टेंबर २०१६ रोजी डहाणू परिसरात झालेल्या विक्रमी पावसाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
अतिवृष्टीची प्रमुख कारणे
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम.
वातावरणात तयार होणारा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा.
वाऱ्यांच्या धडकेमुळे उंचावर तयार होणारे पावसाळी ढग.
समुद्रातील चक्रीय हवामान प्रणालींमुळे निर्माण होणारी अनुकूल परिस्थिती.
या सर्व नैसर्गिक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे पालघर आणि उत्तर कोकणात अनेकदा अल्पावधीत विक्रमी पाऊस पडतो आणि पूरस्थिती निर्माण होते.