मुंबई : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. वारंवार पेपरफुटीच्या घटनांनंतरही शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला नाही, त्यामुळे तरुणांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि अखेर सरकारला माघार घ्यावी लागली, असे ते म्हणाले. "एका वाक्यात सांगायचं तर 'जेन झी'ने सरकारच्या झिंज्या उपटल्या," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राज ठाकरे यांनी दावा केला की, तरुणांचा रोष आता केवळ शिक्षणमंत्र्यांपुरता मर्यादित नसून तो थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. देशभरातील तरुणांच्या संघर्षाचा हा मोठा विजय असल्याचे सांगत त्यांनी शिवाजी पार्क येथे विजय आणि अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
या आंदोलनात अभिजित दीपके यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगत, पुढील काळात ते जो निर्णय घेतील त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
पेपरफुटीच्या घटना नवीन नसल्याचे नमूद करत राज ठाकरे म्हणाले की, अशा गंभीर प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून शिक्षणमंत्र्यांनी खूप आधीच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता.