आंबेगाव बुद्रुक, पुणे : श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आषाढी एकादशी उत्सव तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी पददर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कै. विठ्ठलराव बेलदरे पाटील चौक, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.पहाटे काकड आरती, श्रींची महापूजा, महाआरती तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी झालेल्या महाआरतीनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी पददर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी करून दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा शिक्षण समितीचे विद्यमान अध्यक्ष मा. अरुण राजवाडे उपस्थित होते. त्यांनी देवशयनी आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात कोषाध्यक्ष पूज्य गुरुगोविंद गिरी व्यास यांच्या हस्ते श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सांस्कृतिक उपक्रमांचा गौरव झाल्याचा उल्लेख करत, दक्षिण पुण्यात उभे राहिलेले हे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र घडविण्यात संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व नागरिकांना देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी रोहन बेलदरे पाटील म्हणाले, “दक्षिण पुण्यातील प्रति पंढरपूर म्हणून या मंदिराची ओळख निर्माण झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. वारकरी परंपरा आणि धार्मिक संस्कृती जपत वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा हा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.”
या प्रसंगी श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील, पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेवक संदीप बेलदरे पाटील, अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहन बेलदरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद खुडे, जगदीश हलकुडे, प्रभाकर खरे, अनंत माने, अविनाश साळुंखे, राजुशेठ वर्मा, मनोजशेठ रावळ, रवी पडवळ, अभिजीत शिरोळे, रोहन भटेवरा, चंद्रकांत नेरपगार, इंदुमती भोसले, गणेश शेट्टी आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विश्वस्त, सभासद, कार्यकर्ते आणि सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.