पिरंगुट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट आणि अक्षय ब्लड बँक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रथम जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' हा सामाजिक संदेश देत पिरंगुट-पवळेआळी येथील भैरवनाथ मंदिरात हा उपक्रम उत्साहात पार पडला.
रक्तदान हे एक अत्यंत पवित्र दान असून त्याद्वारे अनेकांचे प्राण वाचतात आणि रक्ताची सततची गरज भागविण्यास मोठी मदत होते. ही सामाजिक जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातील एनसीसी विभाग आणि अक्षय ब्लड बँक, पुणे यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. शंकरभाऊ मांडेकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. शांताराम दादा इंगवले, डॉ. योगेश बुरांडे, श्री. महेश वाघ व सहकारी डॉक्टर तसेच मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात तब्बल ३० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले.
याप्रसंगी आमदार शंकरभाऊ मांडेकर म्हणाले, "स्व. अजितदादा यांची समाजाशी असलेली घट्ट नाळ आणि प्रशासनावर असलेली प्रभावी पकड आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वसा व वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळामुळे मुळशी तालुक्याचा शैक्षणिक विकास होत असून सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे."
या रक्तदान शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण झाली. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आयोजित या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार, संस्थेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य मा. ॲड. संदीप कदम, खजिनदार मा. ॲड. मोहनराव देशमुख, सहसचिव मा. श्री. एल. एम. पवार तसेच सहसचिव (प्रशासन) मा. श्री. ए. एम. जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. भरत कानगुडे, डॉ. विजय बालघरे, डॉ. अभय पाटील, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. अविनाश रोकडे तसेच विविध समिती समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रशासकीय सेवक यांनी केले. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत सामाजिक जाणिवांची जपणूक केली.