सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 शहर

स्व. अजितदादा पवार साहेबांची जयंती पिरंगुट कॅम्पमध्ये विधायक उपक्रमांनी उत्साहात साजरी

डिजिटल पुणे    27-07-2026 12:20:21

पिरंगुट : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयाने समाजहिताचे विविध विधायक उपक्रम राबवत त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागातून अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली, प्लास्टिक संकलन मोहीम आणि रस्ता सुरक्षा अभियान यांचे आयोजन करण्यात आले.

आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये युवकांमध्ये वाढत चाललेले व्यसनाधीनतेचे प्रमाण, पर्यावरणासमोरील प्लास्टिक प्रदूषणाचे गंभीर संकट आणि वाढते रस्ते अपघात या तीन महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमांमधून देण्यात आला.

अमली पदार्थविरोधी रॅलीद्वारे युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे, निरोगी व जबाबदार जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले. प्लास्टिक संकलन मोहिमेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे निसर्गावर होणारे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहनचालकाची जबाबदारी आणि अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक खबरदारी याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी बावधन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) श्री. परवेज शिकलगार यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीचे महत्त्व आणि युवकांची सामाजिक जबाबदारी याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राकेश गुमाने तसेच सहायक पोलीस निरीक्षक श्री. अनिल बत्तीसे यांनी वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, तसेच सुरक्षित रस्ते संस्कृती निर्माण करण्याचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, एनसीसी प्रमुख डॉ. अविनाश रोकडे आणि डॉ. अभय पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.

समाजहिताला प्राधान्य देणारे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारे हे उपक्रम स्व. अजितदादा पवार साहेबांच्या लोकाभिमुख कार्याला साजेसा मानवी व विधायक अभिवादन ठरले. या उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच पिरंगुट परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.


 Give Feedback



 जाहिराती