बुलढाणा : राज्यभर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तब्बल 24 वर्षांपासून विभक्त झालेल्या आई आणि मुलाची भावनिक भेट घडून आली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हरवलेला मुलगा पुन्हा कुटुंबाच्या संपर्कात आला आणि संपूर्ण परिसर भावूक झाला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगाव येथील नवनाथ धोंडीबा गायकवाड हे कौटुंबिक वादानंतर सुमारे 24 वर्षांपूर्वी घर सोडून गेले होते. विविध ठिकाणी वास्तव्यानंतर ते मलकापूर येथे स्थायिक झाले आणि तेथेच संसार थाटला. मात्र, त्यांच्या आईसह कुटुंबीय अनेक वर्षे त्यांच्या शोधात होते.
दरम्यान, मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामासाठी बीएलओ नीता भोंबे आणि सहाय्यक बीएलओ अनिल भोंबे नवनाथ यांच्या घरी पोहोचले. पडताळणीदरम्यान त्यांचे नाव सोलापूरच्या मतदार यादीशी संबंधित असल्याचे आढळले. त्यानंतर करमाळा येथील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर नवनाथ यांची ओळख निश्चित झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात आली.
ही माहिती मिळताच नवनाथ यांची आई, भाऊ, बहीण आणि नातेवाईकांनी जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास करून मलकापूर गाठले. तब्बल 24 वर्षांनंतर आईने मुलाला मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उपस्थित बीएलओ आणि स्थानिक नागरिकही हा भावनिक क्षण पाहून भारावून गेले.या भेटीदरम्यान नवनाथ यांच्या आईने सुनेच्या गळ्यात स्वतःचे मंगळसूत्र घालून संपूर्ण कुटुंबाला गावी परत येण्याचे प्रेमळ आवाहन केले. नवनाथ यांनीही लवकरच गावाला भेट देण्याचे आश्वासन दिले.
मतदार यादी अद्ययावत करण्याच्या नियमित प्रशासकीय प्रक्रियेमुळे एका कुटुंबाचे तुटलेले नाते पुन्हा जुळले. मलकापूरमधील ही घटना प्रशासनाच्या संवेदनशीलतेसह माणुसकीचा हृदयस्पर्शी अनुभव ठरली आहे.