सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
  • पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
  • रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
 जिल्हा

विदर्भात पावसाचा कहर! गडचिरोलीत चार गावांचा संपर्क तुटला; मेळघाटात पूरस्थिती गंभीर, गोंदियात चक्रीवादळाने मोठे नुकसान

डिजिटल पुणे    30-07-2026 15:48:30

गडचिरोली : हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गडचिरोली, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला असून घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गडचिरोलीत पुराचा विळखा; सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क खंडित

गडचिरोली जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पुलावरून पाणी वेगाने वाहू लागल्याने चार गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे या गावांतील नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसह अत्यावश्यक सेवांसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आल्लापल्ली शहरातही पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील पेट्रोल पंपालाही पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

१८ प्रमुख मार्ग बंद; अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प

पूरामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर वाहतुकीचा मोठा परिणाम झाला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल १८ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाला, आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मोसम आणि टेकमपल्ली नाले तसेच आष्टी-आलापल्ली मार्गावरील दीना नदीवरील पुलांवरून पाणी वाहत आहे.

याशिवाय एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, धानोरा, कोरची, कुरखेडा, चामोर्शी आणि आरमोरी तालुक्यांतील अनेक रस्तेही बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त रस्त्यांवरून प्रवास न करण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

मेळघाटात पावसाचे रौद्ररूप; सिपना नदीला पूर, २० ते २५ गावांचा संपर्क तुटला

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातही मुसळधार पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. धारणी तालुक्यात दिवसभर आणि रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सिपना नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने २० ते २५ गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

पूरामुळे अनेक गावांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. दरम्यान, पूर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने धरणाचे तीन दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गोंदियात चक्रीवादळाचा तडाखा; शंभरहून अधिक झाडे उन्मळून पडली

गोंदिया जिल्ह्याला बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर रात्री मुसळधार पावसासोबत आलेल्या चक्रीवादळाने मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या परिसरात मोठे नुकसान केले. जोरदार वाऱ्यामुळे शंभरहून अधिक झाडे उन्मळून पडली, तर दोन घरांची पडझड झाली.

या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यापैकी नीमरीत ताराम आणि संदीप ताराम यांची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित सहा जखमींवर केशोरी येथे उपचार सुरू असून अनेक घरांवर झाडे कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीची मागणी

चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.


 Give Feedback



 जाहिराती