सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
  • पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
  • रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
 क्राईम

बायकोच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटची निर्घृण हत्या; पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पुणे पोलिसांनी काही तासांत उलगडला थरारक गुन्हा

डिजिटल पुणे    30-07-2026 15:57:43

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून घडलेल्या एका थरारक हत्याकांडाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगवान तपास करत काही तासांत उलगडा केला आहे. एकाच खोलीत राहणाऱ्या रूममेटचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपीने पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून निर्जन झुडपात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली असून, या घटनेमुळे शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) हा करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे (वय १९) आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तिघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. पत्नीचे गौरवसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मुकेशच्या मनात निर्माण झाला होता. या संशयातूनच त्याने गौरवचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.

२४ ते २६ जुलैदरम्यान झालेल्या वादानंतर मुकेशने गौरवचा गळा दाबून खून केला. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्याने पत्नी जान्हवीची मदत घेतली. दोघांनी मिळून मृतदेह एका मोठ्या पोत्यात भरला आणि करंजेनगर परिसरातील मोकळ्या मैदानाजवळील झुडपात नेऊन टाकला. कोणालाही संशय येऊ नये आणि पुरावे नष्ट व्हावेत, यासाठी त्यांनी संपूर्ण कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले.

२६ जुलै रोजी दुपारी स्थानिक नागरिकांना झुडपात संशयास्पद पोते दिसले. त्यातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोते उघडले असता त्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृताची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

यानंतर शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांची माहिती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही तासांतच मृत तरुण हा गौरव उर्फ अक्षय वायकर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला असता तो मुकेश आणि जान्हवी यांच्यासोबत राहत असल्याचे समोर आले.

दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कसून चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीच्या कथित अनैतिक संबंधाच्या संशयातूनच हा खून केल्याचे आरोपी मुकेशने कबूल केले, तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपण मदत केल्याचे जान्हवीनेही सांगितले.

या प्रकरणी मृत गौरवची आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुकेश सोनवणे आणि जान्हवी पाटोळे या दोघांना अटक केली असून, या गुन्ह्यामागे आणखी कोणते कारण होते का, तसेच हत्येपूर्वी आणि नंतरच्या घटनाक्रमाचा तपास सुरू आहे.या घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू असून, संशयातून घडलेल्या या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.


 Give Feedback



 जाहिराती