मुंबई : मुंबईतील ट्रॉमा केअर रुग्णालयात एका १९ वर्षीय अविवाहित तरुणीने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात अकाली (प्री-मॅच्युअर) बाळाला जन्म दिल्यानंतर नवजात अर्भकाला कचरापेटीत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत नवजाताला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. सध्या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सोमवारी (२७ जुलै) पोटदुखीची तक्रार घेऊन जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या अपघात व आपत्कालीन विभागात दाखल झाली होती. प्राथमिक नोंदणी झाल्यानंतर ती स्वच्छतागृहात गेली. तेथेच तिने अकाली बाळाला जन्म दिला. त्यानंतर नवजात बाळाला कचरापेटीत टाकून ती बाहेर आली नाही.काही वेळाने स्वच्छतागृहातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संशय आला.
दरवाजा आतून बंद असल्यामुळे तो उघडण्यास काहीसा वेळ लागला. अखेर दरवाजा उघडल्यानंतर नवजात बाळ कचरापेटीत आढळून आले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाळाला बाहेर काढून प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारांसाठी व्ही. एन. देसाई रुग्णालयात हलविण्यात आले.
सध्या नवजात बालकावर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर संबंधित तरुणीवर ट्रॉमा केअर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाची मेडिको-लीगल केस नोंदवली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत जोगेश्वरी पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडूनही यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसून तपासानंतरच पुढील माहिती समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.