पुणे : पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने आज मुठा नदीपात्रात टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवून सुमारे ४५ हजार क्युसेक्स करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठावरील तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. याच पार्श्वभूमीवर धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजता धरणातून विसर्ग वाढवून ४३,५७१ क्युसेक्स करण्यात येणार असून परिस्थितीनुसार तो पुढे ४५ हजार क्युसेक्सपर्यंत नेला जाऊ शकतो. त्यामुळे नदीपात्रातील काही रस्ते, बांधकामे आणि सखल भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्रातील पंप, शेतीची अवजारे, वाहने, जनावरे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय महानगरपालिका, महसूल विभाग, पोलीस, ग्रामपंचायत आणि इतर संबंधित यंत्रणांना नदीकाठच्या परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांना तातडीने सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.