पुणे : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत अनेक आठवणींना उजाळा दिला. गुजरातमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला आणि अजित डोवाल यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्साही त्यांनी उपस्थितांसमोर सांगितला.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (लोकमान्य टिळक स्वराज्य संघ) यांच्या वतीने मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर आयोजित सोहळ्यात अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना शाह यांनी हा पुरस्कार डोवाल यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला मिळणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.
पुरस्कार हा केवळ सन्मान नसून समाजाकडून व्यक्त होणारी कृतज्ञतेची भावना असल्याचे अमित शाह म्हणाले. अशा सन्मानामुळे व्यक्तीला अधिक जोमाने देशसेवा करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
शाह यांनी सांगितले की, गुजरातमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा केवळ एक दहशतवादी हल्ला नसून मोठ्या कटाचा भाग असल्याचे सांगितले होते. या प्रकरणाचा सर्वंकष तपास करण्यासाठी आणि देशभरातील अशाच घटनांचा अभ्यास करण्यासाठी अजित डोवाल यांचा अनुभव घेण्याचा सल्ला मोदी यांनी दिला होता.
यावेळी त्यांनी पहिल्या भेटीची आठवण सांगताना, "अजित डोवाल दुपारच्या सुमारास माझ्या घरी आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुजरात पोलिसांनी केवळ अहमदाबादच नव्हे, तर देशातील १३ ठिकाणच्या बॉम्बस्फोट प्रकरणांचा तपास उलगडण्यात मोठे यश मिळवले," असे सांगितले. डोवाल यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मार्गदर्शनामुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाल्याचेही शाह यांनी स्पष्ट केले.
भाषणाच्या सुरुवातीला अमित शाह यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याची स्थापना केली, तर लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याची ज्योत प्रज्वलित केली. टिळक हे निर्भीड पत्रकार, कर्मयोगी आणि महान