पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. पुण्यात झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डोवाल यांनी आपल्या भाषणातून विशेषतः Gen Z पिढीला राष्ट्रनिर्माणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
डोवाल म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणे हा आपल्या आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. पुण्यात शिक्षण घेत असताना टिळकांच्या विचारांचा प्रभाव आपल्या मनावर पडला होता आणि आज त्यांच्या नावाने सन्मानित होणे ही मोठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांना उद्देशून बोलताना त्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनाला वाटेल तसे वागणे नसून, राष्ट्रहिताची जबाबदारी स्वीकारणे हा खरा स्वातंत्र्याचा अर्थ असल्याचे स्पष्ट केले. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कठीण परिस्थितीत संघर्ष करत देशात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचा त्याग, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याचे डोवाल यांनी नमूद केले.
प्लेगच्या साथीदरम्यान स्वतःच्या मुलाचे निधन झाले तरीही टिळकांनी समाजसेवा आणि राष्ट्रकार्य थांबवले नाही, याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या कार्याला मानवतेचा आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च आदर्श म्हटले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, महर्षी कर्वे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर आणि सेनापती बापट यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा वारसा लाभलेल्या पुण्यभूमीचेही त्यांनी कौतुक केले.
देशाच्या सुरक्षेचा उल्लेख करताना डोवाल यांनी युवकांना सावध राहण्याचा सल्ला दिला. देशाचे नुकसान होईल असा कोणताही मार्ग स्वीकारू नये आणि प्रत्येक निर्णयात राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. भारतासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हाने असल्याचे सांगत त्यांनी एकजुटीने देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याचे आवाहन केले.
भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचाही उल्लेख केला. देशाला सक्षम, सुरक्षित आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी देशभक्तीवर आधारित कविता सादर करत त्यांनी उपस्थित युवकांना राष्ट्रसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन केले आणि Gen Z पिढीने भारताला आत्मनिर्भर, विकसित आणि जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनविण्यात सक्रिय भूमिका बजावावी, असा संदेश दिला.