सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. पांडुरंग सोमना कळ्ळी (वय 46) याला दोषी ठरवत न्यायालयाने हा कठोर निर्णय दिला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने बालिकेचा मृतदेह घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला होता.
या प्रकरणाची सुनावणी अवघ्या दीड वर्षांत पूर्ण झाली असून, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात जलदगतीने निकाल लागलेल्या महत्त्वाच्या घटनांपैकी ही एक मानली जात आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी पीडित बालिका घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिची आई कर्नाटकातील माहेरी, तर वडील कामानिमित्त रत्नागिरी येथे असल्याने ती आजीकडे राहत होती. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच माहिती न मिळाल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, मुलीच्या घराशेजारी राहणारा आरोपीही शोधमोहिमेत सहभागी झाला होता. मात्र त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातील लोखंडी पेटीत प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवलेला बालिकेचा मृतदेह जप्त केला.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते. पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या 15 दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर मांडले. सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील निष्कर्षांचा विचार करून विशेष न्यायालयाने आरोपी पांडुरंग सोमना कळ्ळी याला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाचे पीडित कुटुंबीयांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.