सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता
  • मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 राज्य

महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; पुरावे अपुरे असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

डिजिटल पुणे    03-08-2026 12:17:52

दिल्ली : महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्वनी पनवार यांनी सोमवारी हा निकाल सुनावला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसल्याचे नमूद करत बृजभूषण शरण सिंह आणि माजी सचिव विनोद तोमर यांना दोषमुक्त केले.

या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर २ जुलै २०२६ रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. जानेवारी २०२३ मध्ये महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप करत जंतर-मंतरवर आंदोलन छेडले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. सुमारे तीन वर्षे चाललेल्या न्यायप्रक्रियेत १२७ सुनावण्या झाल्या.

दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रावर आधारित आरोप १० मे २०२४ रोजी निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली. बृजभूषण शरण सिंह हे २० जुलै २०२३ पासून नियमित जामिनावर होते. या प्रकरणातील अल्पवयीन कुस्तीपटूशी संबंधित पोक्सोचा गुन्हा यापूर्वीच रद्द करण्यात आला होता.

निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले, "मी सुरुवातीपासूनच तक्रारींमध्ये विरोधाभास असल्याचे सांगत होतो. न्यायालयाने आम्हाला सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त केले आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असून सविस्तर आदेशाची प्रत मिळाल्यानंतर अधिक प्रतिक्रिया देईन."

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा महिला कुस्तीपटूंनी विविध स्पर्धा आणि शिबिरांदरम्यान अयोग्य स्पर्श, लैंगिक मागण्या आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. मात्र, न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे आरोप सिद्ध होत नसल्याचे नमूद करत त्यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या या बहुचर्चित प्रकरणाचा न्यायालयीन टप्पा संपुष्टात आला.


 Give Feedback



 जाहिराती