सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता
  • मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 विश्लेषण

देशातील शिक्षणविश्वाला मोठा धक्का! शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास

डिजिटल पुणे    04-08-2026 13:21:09

कोल्हापूर : देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि विविध राज्यांचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या दूरदृष्टी, परिश्रम आणि समाजसेवेच्या भावनेतून देशभरात शिक्षणाचे विशाल जाळे उभे केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे, हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या शैक्षणिक संस्था आज देश-विदेशातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, पुढे त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर होत शिक्षण क्षेत्रात पूर्णवेळ योगदान देण्याचा निर्णय घेतला.

१९८३ मध्ये नवी मुंबई येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील मोठ्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे पुणे, नवी मुंबई, कोल्हापूरसह देशातील विविध भागांत विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, नर्सिंग आणि इतर अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी उभारल्या. त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.

शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. नवी मुंबईतील जागतिक दर्जाचे डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते. या स्टेडियममध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल स्पर्धा आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले आहे. तसेच त्यांनी आरोग्यसेवेसाठी रुग्णालये आणि वैद्यकीय प्रकल्पही उभारले.

त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांची त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. संजय डी. वाय. पाटील, आमदार सतेज (बंटी) पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, कन्या डॉ. नंदिता पालशेतकर तसेच नातू ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांनी शून्यातून उभे केलेले शिक्षणविश्व हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने शिक्षण आणि सार्वजनिक जीवनातील एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त केली.

शिक्षण, समाजसेवा, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात दिलेले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने देशातील शिक्षणविश्वातील एक युग संपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती