सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता
  • मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 विश्लेषण

पुणेकरांना मोठा दिलासा! शहरातील पाणीकपात अखेर पूर्णपणे रद्द; धरणांतील मुबलक साठ्यामुळे महापालिकेचा निर्णय

डिजिटल पुणे    04-08-2026 14:59:41

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात अखेर पूर्णपणे रद्द करण्यात आली असून, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे शंभर टक्के भरली असून, टेमघर धरणात सुमारे ९८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही ताण राहिलेला नसून, नागरिकांना आता नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनीही दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन देत पाणीकपात तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती.

यंदा जूनच्या सुरुवातीला अपुऱ्या पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने १५ जूनपासून पाणीकपात लागू केली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. आषाढी वारीच्या काळात पाच दिवस पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. पुढील आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असे प्रशासनाने सांगितले होते. अखेर धरणांतील मुबलक साठा लक्षात घेऊन पाणीकपात पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून, शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत नियमित होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती