सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता
  • मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 शहर

अण्णाभाऊ साठे जयंती 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरी ;लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांना साहित्य, समता आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा

डिजिटल पुणे    04-08-2026 16:00:02

पिरंगुट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 'लेखन प्रेरणा दिन' तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. साहित्य, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि वैचारिक लेखनाची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ. विजय बालघरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेचा, सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आणि लोककलेच्या माध्यमातून उभारलेल्या जनजागृतीचा प्रभावी आढावा घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर मार्क्स, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या कादंबऱ्यांतील स्त्री व्यक्तिरेखा या संघर्षशील, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदान, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' या विचाराची प्रेरणा, शिक्षण, पत्रकारिता आणि समाजप्रबोधनातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांनी 'गीतारहस्य' या ग्रंथाचे वैचारिक महत्त्वही विद्यार्थ्यांसमोर उलगडले.

डॉ. गणेश डोके यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देताना त्यांच्या विचारविश्वावर वारकरी संप्रदाय, भक्ती चळवळ आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो, असे मत व्यक्त केले.

'लेखन प्रेरणा दिना'निमित्त विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखन, चिकित्सक विचार, वाचनसंस्कृती आणि सामाजिक जाणीव जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. विचारांना प्रभावी शब्दरूप देण्याची क्षमता ही व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वाची गुरुकिल्ली असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय विषयांवर आपले विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनातून जिद्द, समता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घ्यावी, तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिष्ठ, स्वाभिमानी आणि कर्तव्यपरायण विचारांचे आचरण आपल्या जीवनात करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. गणेश चौधरी यांनी केले, तर प्रा. अविनाश हुंबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"लेखनातून विचार, विचारातून परिवर्तन आणि परिवर्तनातून समाजनिर्मिती" हा संदेश देणारा हा संयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागरूकता, सामाजिक संवेदनशीलता आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करणारा ठरला.


 Give Feedback



 जाहिराती